आटपाडी नगरपंचायत निवडणूक २०२५ : प्रभाग क्र. १४ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या संध्या पाटील विजयी

माणदेश एक्सप्रेस न्यूज : आटपाडी / प्रतिनिधी : आटपाडी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या मतमोजणीमध्ये प्रभाग क्रमांक १४ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार संध्या अनिल पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर स्पष्ट आघाडी घेत या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकावला. त्यांच्या विजयानंतर प्रभागात तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
या प्रभागात यावेळी चौरंगी लढत रंगली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संध्या पाटील यांना एकूण ४९९ मते मिळाली. त्यांच्या प्रमुख प्रतिस्पर्धी शिवसेना पक्षाच्या सुभ्रदा बाजीराव पाटील यांना ३६१ मते मिळाली. तर भाजप पक्षाच्या पूजा अप्पासाहेब जाधव यांना ९६ मते मिळाली. तीर्थक्षेत्र विकास आघाडी च्या विद्या भाऊसाहेब पाटील यांना ८ मते मिळाली. NOTA ला ६ मते नोंदवली गेली.
संध्या पाटील या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सांगली जिल्हा युवा जिल्हाध्यक्ष अनिलशेठ पाटील यांच्या पत्नी असून, या विजयाला राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी स्थानिक विकास, नागरी सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि महिलांसाठी मूलभूत सोयीसुविधा या मुद्द्यांवर भर दिला होता. याच मुद्द्यांना मतदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे निकालावरून स्पष्ट होते.
मतमोजणीदरम्यान आटपाडी तहसील कार्यालय परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निकाल जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद साजरा केला. गुलाल उधळून आणि घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवाराच्या विजयाचे स्वागत केले.
या विजयानंतर आटपाडी नगरपंचायतीतील राजकीय समीकरणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रभाग क्रमांक १४ मधील हा विजय आगामी काळातील नगरपंचायतीच्या कारभारावर प्रभाव टाकणारा ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.




