आटपाडी नगरपंचायत निवडणूक : प्रभाग क्रमांक 3 मधून शिवसेनेच्या अमरसिंह पाटील यांचा दणदणीत विजय

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी / प्रतिनिधी : आटपाडी नगरपंचायतीसाठी दिनांक ०२ डिसेंबर रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाची मतमोजणी आज (दि. २१) आटपाडी तहसीलदार कार्यालय येथे शांततेत पार पडली. या मतमोजणीत प्रभाग क्रमांक 3 मधून शिवसेनेचे उमेदवार अमरसिंह आनंदराव पाटील यांनी विजय मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले.
प्रभाग क्रमांक 3 मध्ये यावेळीचौरंगी लढत पाहायला मिळाली. शिवसेनेचे अमरसिंह आनंदराव पाटील यांना एकूण २४८ मते मिळाली. त्यांच्याविरोधात भाजपकडून रोहित दिलीप जगताप यांनी निवडणूक लढवली असून त्यांना १९२ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजय सखाराम पाटील यांना २९ मते मिळाली, तर अपक्ष उमेदवार डॉ. श्रीनाथ लक्ष्मणराव पाटील यांना ६९ मते मिळाली. NOTA ला केवळ १ मत नोंदवले गेले.
अमरसिंह पाटील यांच्या विजयानंतर शिवसेना कार्यकर्ते व समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मतमोजणी निकाल जाहीर होताच समर्थकांनी फटाके फोडून व घोषणा देत आनंद व्यक्त केला. नागरिकांनी दिलेल्या विश्वासाबद्दल अमरसिंह पाटील यांनी मतदारांचे आभार मानले असून, प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली आहे.
या विजयामुळे आटपाडी नगरपंचायतीतील शिवसेनेची ताकद वाढली असून आगामी काळात नगरपंचायतीच्या राजकारणावर या निकालाचा प्रभाव पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



