दु:खद बातमी : ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ काळाच्या पडद्याआड

माणदेश एक्सप्रेस न्युज : मुंबई : ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन झाले. वयाच्या 86 व्या वर्षी वृद्धापकाळाने प्राणज्योत मालवली. विज्ञान आणि साहित्य अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये नारळीकरांनी उत्तुंग कामगिरी केली. नारळीकरांनी 11 जून 1964 रोजी गुरुत्वाकर्षणासंबंधीचा सिद्धान्त मांडला होता. अवघ्या 26 व्या वर्षी त्यांनी हा सिद्धान्त मांडला होता. त्यातूनच पुढे विश्वनिर्मितीच्या रहस्यावरील संशोधनाला चालना मिळाली. नारळीकर हे जागतिक ख्यातीचे शास्त्रज्ञ आणि मराठी विज्ञानकथेला आधुनिक चेहरा देणारे लेखक होते. 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती.
नारळीकरांचा जन्म 19 जुलै 1938 रोजी कोल्हापुरात झाला होता. त्यांचे वडील विष्णू नारळीकर हे प्रसिद्ध गणिततज्ञ आणि वाराणसी इथल्या हिंदू विद्यापिठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते. नारळीकरांचं शालेय शिक्षण वाराणसीमध्येच झालं. 1957 मध्ये त्यांनी विज्ञानात पदवी प्राप्त केली होती. या परीक्षेत त्यांनी पहिला क्रमांक पटकावला होता. त्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी केंब्रिजला गेले.
गुरुत्वाकर्षणासंबंधीचा सिद्धान्त मांडल्यानंतर एका रात्रीत नारळीकरांचं नाव घरोघरी पोहोचलं होतं. त्यावेळी ते स्वतंत्र भारतातील विज्ञानजगताचा चेहरा ठरले होते. त्यानंतर 1965 मध्ये भारतदर्शन मोहीम काढत नारळीकरांनी ठिकठिकाणी व्याख्यानं दिली होती. सरकारकडूनही नारळीकरांची दखल घेण्यात आली होती. 1965 मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ या पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं. त्यावेळी ते सत्तावीस वर्षांचे होते. पुढे 2004 मध्ये त्यांना ‘पद्मविभूषण’ सन्मानही मिळाला. 2010 मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होतं.
नारळीकर यांचं चार दशकांहून अधिक काळापासून खगोलभौतिकी क्षेत्रात संशोधन सुरू होतं. त्याचसोबत ते पुस्तकंही लिहित होते. सर्वसामान्य माणसाला खगोलशास्त्रज्ञ समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्न केले आहेत. त्यांच्या ‘यक्षांची देणगी’ या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला होता. ‘अंतराळातील भस्मासूर’, ‘अभयारण्य’, ‘अंतराळातील स्फोट’, ‘टाइम मशीनची किमया’, ‘प्रेषित’ अशी अनेक विज्ञानकथांची पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. दररोजच्या संशोधनाच्या कामातून विरंगुळा मिळावा, सामान्य वाचकाला वैज्ञानिक विश्वातील एखादा थरारक अनुभव द्यावा, विज्ञानाचं महत्व आणि वैज्ञानिक दृष्टीकोन समाजाला मिळावा म्हणून ते विज्ञानकथा लिहित असत. त्यांच्या पुस्तकांची विविध भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत. त्याचप्रमाणे विविध मराठी नियतकालिकांमधून नारळीकर यांचे विज्ञानविषयक ललित लेखन सातत्याने प्रसिद्ध होत असत.
#JayantNarlikar #TributeToScientist #LegendLost #IndianScience #Astrophysicist #RIPJayantNarlikar #ScientificLegend #NarlikarSir
#जयंतनारळीकर #डॉजयंतनारळीकर #विज्ञानरत्न #खगोलशास्त्रज्ञ #भारताचागौरव #विज्ञानयोध्दा #RIPजयंतनारळीकर #शोकसभा #Vishwaratna #भारतीयविज्ञान