Mohan Bhagwat : जोडप्याला किमान तीन मुलं हवीत !
माणदेश एक्सप्रेस न्युज : नागपूर : लोकसंख्यावाढीबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी हिंदू जोडप्याला किमान तीन मुले हवीत, असे त्यांनी म्हटले आहे. त्यासाठी भागवतांनी लोकसंख्याशास्त्राचा हवाला दिला आहे. लोकसंख्या वाढीचा दर 2.1 टक्क्यांपेक्षा कमी व्हायला नको, तसे झाल्यास समाज नष्ट होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
नागपूर येथे आयोजित कठाले कुल संमेलनात बोलताना भागवत यांनी ही भूमिका मांडली. अनेक भाषा आणि समाज अशाचप्रकारे नष्ट झाल्याचे सांगत भागवत म्हणाले, साल 2000 च्या जवळपास भारतातील लोकसंख्येचे धोरण तयार करण्यात आले होते. देशातील लोकसंख्या वाढीचा दर 2.1 टक्क्यांपेक्षा जास्त असायला हवा, असे त्यामध्ये नमूद करण्यात आले होते.
अनेक जोडपी एकही अपत्य जन्माला घालण्यास तयार नाहीत, यावरही भागवतांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, लोकसंख्या शास्त्रानुसार लोकसंख्या वाढीचा दर 2.1 पेक्षा खाली गेला तर तो समाज नष्ट होतो. तो जगाच्या पाठीवर राहत नाही. तो स्वत:हून नष्ट होतो. त्यामुळे लोकसंख्या वाढीचा दर वाढण्यासाठी जोडप्याला दोनपेक्षा जास्त म्हणजे किमान तीन अपत्य हवीत, असे भागवत यांनी सांगितले.
लोकसंख्या वाढीचा दर योग्य असणे देशाच्या भविष्यासाठी गरजेचे आहे, असे विधानही भागवतांनी केले आहे. दरम्यान, देशात मागील तीन वर्षांपूर्वी जनगणना अपेक्षित असताना झालेली नाही. त्यामुळे कोणत्या समाजाची लोकसंख्या किती आहे, याचे मापदंड 2011 च्या जनणनेच्या आधारे ठरवले जात आहेत. त्यातच भागवत यांनी लोकसंख्या वाढीच्या दरावरून पुन्हा एकदा चर्चेला तोंड फोडले आहे.