धडाडीच्या बहुजन नेत्यास राज्याचे मंत्रीपद मिळावे : शिक्षक संघटनेच्या नेत्याची मागणी
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : जवळजवळ १७ वर्षे अथकपणे, पायाला भिंगरी बांधून अखंड महाराष्ट्रातील बहुजन, अल्पसंख्य, उपेक्षित वंचितांचा हुंकार बनत, प्रस्थापितांविरोधात बेधडकपणे आवाज बुलंद करत कायमच अन्यायाविरोधात धडाडणारी तोफ म्हणजे जत विधानसभेचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांना राज्याचे मंत्रिपद मिळावे अशी मागणी सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन उत्तम जाधव (यु.टी.जाधव) यांनी केली आहे.
यावेळी बोलताना यु.टी.जाधव म्हणाले, गरीब मराठा बांधवांना आरक्षण मिळावे म्हणून २०१२ साली जत तहसीलदार कार्यालयावर सर्वप्रथम मोर्चा काढणारे, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे म्हणून लढणारे, ओबीसींच्या आरक्षणाचे संरक्षण व्हावे म्हणून आवाज उठविणारे, शिक्षण, आरोग्य, एस.टी. कर्मचारी, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशावर्कर, गावगाड्यापासून लमाणतांड्यापर्यंत सर्वच छोट्या मोठ्या समाजघटकासाठी कार्यरत राहणारे, शेती व शेतकऱ्यांसाठी राजेवाडी तलाव फोडणारे, टेंभूचे कार्यालय फोडणारे, एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावरची लढाई लढणारे, गोरगरिबांना न्याय देणारा, अहोरात्र झटणारा,प्रसंगी जनसामान्यांसाठी जेलवारी आनंदाने स्वीकारणारे महाराष्ट्रातील तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेले महाराष्ट्राचे उज्वल भविष्य असणारे गोपीचंद पडळकर यांनी भाजपकडून जत विधानसभेमधून दमदार विजय प्राप्त केला आहे.
माझा आटपाडी-खानापूर तालुका म्हणजे राजकीय व सामाजिक जीवनाचा पाया समजणारे, त्यात दगडाची भर घालणारा माझा धनगर समाज, मजबूत पायावरती उभा राहिलेल्या भिंती म्हणजे महाराष्ट्रातील तमाम बहुजन समाज, त्याच्यावरती घातलेला स्लॅब म्हणजे पक्षाने व नेतृत्वाने केलेला आदर आणि त्या मंदिराचा कळस म्हणजे जत मधील सुज्ञ मतदार बंधू भगिनी यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना निवडून दिले आहे. त्यामुळे अशा दमदार नेतृत्वास राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून संधी मिळावी अशी मागणी यु.टी. जाधव यांनी केली आहे.