आटपाडीत १२ वर्षीय शाळकरी मुलाची गळफास घेत आत्महत्या
आजीकडे शिक्षणासाठी आला होता

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी मापटेमळा येथे आजीकडे शिक्षणासाठी असलेल्या समर्थ अरुण ढोके (वय १२) मूळ रा. पंढरपूर जि सोलापूर (सध्या रा. मापटेमळा ता. आटपाडी) या शाळकरी मुलाने मंगळवारी रात्री गळफास घेतल्याची घटना घडली असून नेमकी मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, पंढरपूर येथील समर्थ हा आपल्या आटपाडी येथील मापटेमळा येथे आजीकडे शिक्षणासाठी राहण्यास होता. तो एका खाजगी अकॅडमी मध्ये शिक्षण घेत होता. मंगळवारी रात्री आठ च्या दरम्यान आजी काही अंतरावर असलेल्या वडिलांच्याकडे गेली होती. यावेळी समर्थ हा एकटाच घरी अभ्यास करत होता. आजी घरी आली तेव्हा समर्थ हा घरी नसल्याचे आढळून आले.
त्याची शोधाशोध केली असता घराच्या पाठीमागील असणाऱ्या पाण्याच्या टाकीला गळफास घेतल्याचे शेजारी राहणाऱ्या दिनेश जाधव याला दिसले. यावेळी दिनेश जाधव याने त्याला आटपाडी येथील ग्रामीण रुग्णालयात आणेल. परंतु त्याचा यामध्ये मृत्यू झाला होता. दरम्यान याबाबत ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. कारंडे यांनी आटपाडी पोलीस ठाण्यास माहिती देत फिर्याद दिली असून सदर घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.