सांगलीत कृष्णा नदीचे पाणी कर्नाळ रोडवर ; अलमट्टीतून ३ लाख क्सुसेक विसर्ग
कोल्हापूरला पुराचा अजूनही धोका
माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग हा ३ लाख क्युसेक इतका करण्यात आलेला आहे. यामुळे कोल्हापूर आणि सांगलीला फार मोठा दिलासा मिळालेला आहे. विशेष करून कोल्हापुरात पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडली असल्याने, कोल्हापूर जिल्ह्यासाठी दिलासादायक आहे.
अलमट्टी धरण येथून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार धरणातून ३ लाख क्युसेक इतका विसर्ग वाढवण्यात आलेला आहे. हा विसर्ग या आधी २ लाख ७५ हजार क्युसेक इतका होता. अलमट्टी धरण हे विजापूर जिल्ह्यात आहे. या धरणातील पाणीसाठ्याचा थेट परिणाम कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरस्थितीतवर होतो, त्यामुळे अलमट्टी धरणातील विसर्गाकडे दोन्ही जिल्ह्यांचे लक्ष असते. कोल्हापुरातील काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेऊन अलमट्टीतून विसर्ग वाढवण्याची मागणी केलेली होती.
कोल्हापूर शहरात राजाराम बंधारा येथे धोका पातळी ४३ फूट आहे. येथे पंचगंगा नदीची पातळी सायंकाळी ६ वाजता ४३.५ फूट इतकी होती. दरम्यान राधानगरी धरणाचे पाच दरवाजे उघडले असून यातून एकूण ८६४० क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. धरणाचे ३, ४, ५, ६ आणि ७ क्रमांकाचे दरवाजे खुले करण्यात आलेले आहेत. कोल्हापूर शहराबाहेरील चिखली, आंबेवाडी अशा काही गावांना पुराचा वेढा पडलेला आहे. कोल्हापुरातील एकूण ८५ बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत.
सांगलीत सध्या वारणा नदीला पूर आलेला आहे. तर सांगली जवळील विल्सन पूल येथे कृष्णा नदीची पातळी ३३ फूट इतकी आहे. चांदोली धरणातून १० हजार ४६० क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. त्यामुळे वारणा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. शिराळा तालुक्यातील वारणा नदीवरील तीन मोठ्या पूलांसह सर्व छोटे पूल पाण्याखाली गेल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्याशी संपर्क तुटला आहे. मिरज, पलूस, वाळवा आणि शिराळा तालुक्यातील शाळा, महाविद्यालयांना शुक्रवारी सुट्टी जाहीर, करण्यात आलेली आहे.
तर कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्याने, काल सायंकाळी पुराचे नदी लगतच्या रस्त्यालगत व अनेक गावामध्ये शिरू लागले आहे. परिणामी सांगलीतील पूरस्थिती गंभीर होत चालली आहे. सध्या सांगलीत कर्नाळ रोड वर पाणी आले असून, याठिकाणी असणाऱ्या सूर्यवंशी प्लॉट मध्ये पाणी शिरू लागल्याने या ठिकाणीच्या नागरिकांना प्रशासनाकडून दुसरीकडे हलविण्यात आले आहे.